बी.जी.शिंदे उदगीर प्रतिनिधी
संजय बनसोडे यांचा ९३ हजार २१४ हजार मताने एतिहासिक विजय ! उदगीरात जल्लोष ; उदगीरला पुन्हा मंत्रीपद फिक्स
उदगीर विधानसभा राखीव २३५ मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय बनसोडे ९३ हजार २१४ मतांनी विजयी झाले. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार सुधाकर भालेराव ५८ हजार ८२४ मते घेऊन द्वितीय क्रमांकावर राहिले. तर अपक्ष भास्कर बंडेवार ४ हजार ६२३ मते घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. यामुळे उदगीरात पुन्हा घड्याळ फुलले आहे.
उदगीर विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत दीपक सावंत ४८०, शिवाजी देवनाळे ९०३, अजय कांबळे १५८, गुरुदेव उदगीरकर ४१०, प्रभाकर कांबळे ३१०, बालाजी सूर्यवंशी २२७, बालाजी कांबळे १५९, बालाजी मोरे ३६५, योगेश उदगीरकर ४८२, स्वप्निल जाधव ४६६ तर नोटाला ९९१ असे एकूण २ लाख २० हजार ८७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय बनसोडे यांना १ लाख ५२ हजार ३८ तर सुधाकर भालेराव यांना ५८ हजार ८२४ मते मिळाली. बनसोडे यांचा तब्बल ९३ हजार २१४ मतांनी विजयी झाले.
विजयानंतर कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करत चौकाचौकात फटाक्याची अतिषबाजी करत गुलाल उधळून पेढे वाटत आनंद साजरा केला.देगलूर रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथून संजय बनसोडे यांच्या शहरामध्ये विजय जल्लोष साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या जल्लोषांमध्ये हातात भारतीय जनता पार्टीचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते.
यावेळी बनसोडे यांच्या पत्नी शिल्पा बनसोडे, भाजपाचे नेते गोविंदराव केंद्रे, भाजपाचे माजी नगराध्यक्ष बसवराज अण्णा बागबंदे, माजी नगरसेवक राजू उर्फ रामचंद्र मुक्कावार, रामचंद्र तिरुके, राहुल केंद्रे, माजी उपनगराध्यक्ष सुधीरभाऊ भोसले, दत्ता पाटील, गणेश गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, राष्ट्रवादी पार्टीचे सरचिटणीस समीर शेख, इब्राहिम देवर्जनकर, हणमंत शेळके, पंचायत समितीचे उपसभापती माजी बाळासाहेब मरलापल्ले, जिल्हा नियोजन समितीचे प्रशासकीय सदस्य प्रा.डॉ. शामभाऊ डावळे, अतनूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, घोणसीचे दीपक आंब्रे, गुत्तीचे सरपंच यादवराव केंद्रे, माजी नगरसेवक व्यंकटराव बोईनवाड, बोंद्रे, राजू हुडगे,मांजरीचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिनकर बिरादार, भाजपाचे जळकोट तालुका अध्यक्ष सत्यवान पांडे, रावणकोळ्याचे सरपंच सत्यवान दळवे पाटील, तिरूक्याचे उपसरपंच श्रीहरी पाटील आदी उपस्थित होते.
पहिल्या फेरीपासूनच संजय बनसोडे यांना मताधिक्यांची लीड मिळत होती. यामध्ये उदगीर मतदार संघातील मोठ्या मोठ्या गावांमध्ये मताधिक्य मिळाले. उदगीर विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजय झाला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला होता. प्रारंभी पोस्टल मताची मोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे यांनी संजय बनसोडे विजय झाल्याचे घोषित केले. या प्रक्रियेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार राम बोरगावकर, तहसीलदार राजेश लांडगे, निवडणूक तहसीलदार संतोष गुट्टे यांनी त्यांना सहकार्य केले. ९३ हजार २१४ मताने संजय बनसोडे यांचा विजय झाल्यानंतर त्यांची उदगीर शहरातून मोठ्या जल्लोषाने विजय मिरवणूक काढण्यात आली.