बी.जी.शिंदे उदगीर प्रतिनिधी
महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य घेत, ना. संजय बनसोडे यांचा दणदणीत विजय
उदगीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी तब्बल १ लाख ४९ हजार ७६६ मतदान घेत, आपले प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सुधाकर भालेराव यांचा तब्बल ९२ हजार ६१ मताधिक्याने दणदणीत पराभव केला आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघासाठी दोन लाख १६ हजार मतदारांनी आपला हक्क बजावला होता. सर्व मतदारांनी ना. संजय बनसोडे यांच्या विकास कामाची आणि त्यांच्या दांडग्या जनसंपर्काची पावती देत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी केले आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार आपले भवितव्य आजमावत होते. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच लढत होईल, हे चित्र कायम राहिले होते. मात्र शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची यंत्रणा ढासाळली, त्यात काँग्रेसचे अनेक नेते ना संजय बनसोडे यांच्या सोबत गेले. अनेकांनी पक्षप्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडीची प्रचार यंत्रणा गडगडली असे म्हटले तर वावगे होणार नाही. वंचित चे उमेदवार शिवाजी देवनाळे यांना केवळ ८८४ मतदान मिळाले तर नोटाला ९७८ मतदान मिळाले.
चौकट…..
हा विजय जनतेला समर्पित.. ना संजय बनसोडे
राज्यात बोटावर मोजण्या इतक्या नेत्यांनी मोठे मताधिक्य घेतले आहे. त्यामध्ये ना. संजय बनसोडे हे अग्रणी आहेत. इतक्या मोठ्या विजयानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधताना हा विजय माझ्या विकास कामाचा आणि जनतेचा आहे. जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला मी पात्र राहीन आणि भविष्यातही जनतेच्या विकास कामासाठी सदैव तत्पर राहीन. असा विश्वास दाखवला आहे. तसेच हा विजय जनतेला समर्पित केला आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतल्यामुळे मला इतके जास्त मताधिक्य मिळाली आहे. मी जनतेचा कायम ऋणी राहणार आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.